माझी मराठी शाळा आपले सहर्ष स्वागत करीत आ

Pages

Wednesday, June 30, 2021

गुगल वर साठवलेली माहिती कशी डिलीट कराल

BBC मराठी सौजन्य

 गूगलच्या 'My activity'मध्ये साठवलेली सगळी माहिती नष्ट करण्याची व्यवस्था आहे.

ते कसं करता येईल? त्याच्यासाठी या आहेत काही टिप्स.

1. 'My activity'

आपण करत असलेला प्रत्येक गूगल सर्च आपल्या गूगल खात्याशी जोडला जातो. एवढंच नव्हे तर, गूगलवर सुरू असलेली आपली प्रत्येक हालचाल टिपली जाते, मग ते जीमेलवर पाहिलेला एखादा ईमेल असो वा गूगल फॉर्म्समध्ये भरलेला एखादा फॉर्म!

ती सगळी माहिती 'My Activity' नावाच्या फोल्डरमध्ये जमा होते आणि तिथूनच ती डिलीट करता येते.

त्यात तारीखवार माहिती शोधण्याचाही पर्याय आहे. तुम्ही या फोल्डरमधली सगळीच माहिती नष्ट करू शकता किंवा एखादी विशिष्ट माहिती शोधूनही काढून टाकू शकता.

माहिती नष्ट करण्यासाठी "All products" आणि "All time" हे पर्यायही आहेतच. हे पर्याय निवडताच, त्याचे काय काय परिणाम होतील, हे सांगणारा एक इशारा गूगलकडून तुमच्या स्क्रिनवर झळकेल.

प्रत्यक्षात, गूगलमधील तुमच्या शोधाचा इतिहास, म्हणजेच Search History किंवा गूगलवरील तुमच्या भटकंतीची माहिती अर्थात Browsing history डिलीट केल्याचे कोणतेही परिणाम आपल्या गूगल खात्यावर किंवा त्या अॅप्लिकेशनच्या वापरावर होत नाही.

2. यूट्यूबवरील माहिती हटवणे

युट्यूब म्हणजे जगातली सर्वांत मोठी व्हीडिओ स्ट्रीमिंग साईट. जगातला कुठलाही लोकप्रिय व्हीडिओ आता तिथे असतोच, तो फक्त आपल्याला शोधावा तेवढा लागतो.

आपण यूट्यूबवर काय शोधतो आणि काय बघतो त्यावरही गूगलचं लक्ष असतं. पण ती माहितीही डिलीट करता येते.

यूट्यूबवर गेल्यावर डाव्या हाताला असलेल्या मेन्यूत 'History'वर क्लिक करा. त्यात "Clear all search history" आणि "Clear watch history" हे पर्याय निवडा.

त्यातही सगळी माहिती तसंच विशिष्ट माहिती, सर्च आपल्याला शोधून डिलीट करता येते.

3. जाहिरातदारांना माहिती असलेला डेटा कसा नष्ट करायचा?

गूगल आपली सगळी माहिती साठवून ठेवतंच, पण त्या माहितीच्या आधारे आपण वावरत असलेल्या वेबसाइट्सवर जाहिरातीही दाखवतं. म्हणजे त्यांच्या सेवा वेबसाईटवर येणाऱ्या अॅड आपण काय शोधलं, पाहिलं किंवा केलं, यावरून ठरवण्यात येतात.

म्हणूनच आपण केलेल्या सर्च किंवा ब्राउझिंगशी मिळत्या जुळत्या जाहिराती आपल्याला दिसू लागतात.

पण काळजी करू नका! गूगलने नेमकी कोणती माहिती जाहिरातदारांना दिली, हे आपण शोधू शकतो. त्यासाठी आपण आपल्या गुगल खात्यात लॉग इन करायचं आणि "Personal info & privacy" या विभागात जायचं.

तिथं पोहोचल्यावर "Ads Settings"चा पर्याय निवडायचा आणि त्यात "Manage ads settings" मध्ये जायचं.

त्यात, "Ads personalisation" हा पर्याय दिसेल. तो जर "Deactivate" किंवा निष्क्रीय केला, तर आपल्या इंटरनेट ब्राउझिंगवर आधारित जाहिराती थांबतात.

तसं करणं हे तुमच्या हिताचं नसल्याचं गूगल सांगेल. त्यामुळे आपल्याला तशा जाहिराती हव्यात का, हे ठरवून मगच निर्णय घ्यावा.

पण, जाहिरातच नको, असा पर्याय मात्र गूगलनं दिलेला नाही.

4. गूगल Location history डिलीट करा

तुम्ही जर अँड्रॉईड फोन वापरत असाल तर गूगल आपल्या लोकेशनची, म्हणजेच आपण कुठे गेलो, याची माहितीही साठवून ठेवतं.

गूगल मॅपवरची ही माहिती डिलीट करण्यासाठी त्या पेजवर गेल्यावर लोकेशन ट्रॅकिंगचं बटण बंद करायचं. तसंच, सगळी किंवा विशिष्ट माहिती डिलीट करायची.

Waste basket हा पर्याय निवडून एखादा विशिष्ट प्रवास किंवा थांबा काढून नष्ट करता येतो.

1 comment:

  1. इयत्ता ११ वी ला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी CET परीक्षा होणार आहे. त्यातील MCQ प्रश्नांचा सराव करण्यासाठी खालील लिंक क्लिक करा:
    https://www.patwardhanclass.com/10/10-CET-2021.php
    (For Semi English and English Medium)
    आपल्या परिचयातील इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांना ही लिंक फॉरवर्ड करा.

    ReplyDelete